संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी
अरूण आनंद नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. ते ‘इंद्रप्रस्थ’ नावाची एनजीओ चालवतात. तिचे ते सीईओ आहेत. ते पत्रकारही आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वरच्या वर्तुळात वावर असतो. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती होती. देशभरातील लॉकडाऊनमुळे ती लोकांनी घरातच साजरी केली. तर आनंद यांनी त्यानिमित्त एक व्हीडीओ प्रसारित केला व एक लेखही प्रकाशित केला. विषय – डा.आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशंसक होते, त्यांचे इतके प्रेम होते, की ते म्हणाले, संघ वाढवा, तुमच्याबरोबर मी निवडणुक युती करतो. संघाचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे जीव की प्राण. त्यातल्या एकाला तर त्यांनी आपल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, या पक्षाचे सचिव, निवडणूक प्रमुख आणि प्रवक्ता नेमले. संघाचे सुप्रिमो गोळवलकरगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या भेटीगाठींमध्ये खलबते होत असत. रणनिती ठरे. बाबासाहेब पुन्हापुन्हा संघाच्या शिबिरांना भेटी देत असत. संघाचे कौतुक करीत असत. त्यामुळे संघाचे लाडके बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा लाडका संघ असे घट्ट नाते होते. हे चित्र असे काही रंगवले गेले की आता बाबासाहेब हे संघाचे स्वयंसेवक होते, एव्हढेच सांगायचे बाकी राहिले.
संघाची एक कार्यपद्धती आहे. एकाचवेळी संघ अनेक आघाड्यांवर कार्यरत असतो. म्हणजे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक बाळ गांगल, भिडेगुरूजी, अरूण शौरी हे महात्मा फुले व बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्याचवेळेला दत्तोपंत ठेंगडी, भिकुजी इदाते, रमेश पतंगे संघ समरसतेच्या मनाचे श्लोक लिहित असताना बाबासाहेब आणि फुले यांच्या आरत्याही करीत असतात. त्याद्वारे त्यांना फुले-आंबेडकरांचे अपहरण करायचे असते. तिसरीकडे अफवा पसरवून घराघरात त्यांच्याबद्दल विद्वेशही पेरला जात असतो. अंगलट आलेच तर आम्ही तर त्यांची नावे प्रात:स्मरणीय म्हणून घेत असतो, असे सांगून सारवासारवही केली जाते.
३२ वर्षांपुर्वी बाळ गांगलांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. महाराष्ट्र संतापला. संघाने गांगलांचा आपला संबंध नाही, असे घोषित करून टाकले. माझ्या पहिल्या पुस्तकात मी गांगलांची मुलाखत छापलीय. तुम्ही फुल्यावर एव्हढे का संतापलात असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षापासून मी स्वयंसेवक आहे. फुले हा हिंदूराष्ट्राच्या स्थापनेतला मुख्य अडथळा आहे, त्यांच्यामुळे ब्राह्मणांचे पावित्र्य, महात्म्य, गारूड धोक्यात आले, हे संघाने मला पटवले, तेव्हापासून मी फुल्यांना शत्रू क्रमांक एक मानतो. भिडेगुरूजी म्हणतात फुले देशद्रोही होते. म्हणजे ज्याने ब्राह्मण्यावर टिका केली, तो देशद्रोही. एका वाहिनीवर बोलताना जाहीरपणे ते म्हणाले, ‘बाबासाहेब मनूला मानणारे होते. मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब जयपूरला स्वत: हजर होते.’ हा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयात बसला १९८९ ला. डॉ. बाबासाहेब त्यापुर्वी ३३ वर्षे आधीच निधन पावलेले. इतके तर बुद्धीमान हे आंबापुत्र भिडेगुरूजी!
अरुण आनंद म्हणाले, ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते.’ बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले, ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.” हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले बाबासाहेबांचे उद्गार आहेत. हे आर.एस.एस.चे कौतुक आहे का?
आनंद म्हणाले, ‘बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाची १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात संघाचे पिल्लू असलेल्या जनसंघाबरोबर युती केली होती.’ १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-
“As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]
“इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.” तेंव्हा जनसंघाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.
आता ही सगळी अस्सल आणि छापील साधने आहेत म्हणून तरी बरे, नाहीतर या लोकांनी काय हैदोस घातला असता माहित नाही.

घटना समितीमधील कामकाजातील उल्लेख.
आनंद यांनी दावा केला, की संघाचे दत्तोपंत ठेंगडी बाबासाहेबांचे लाडके होते. त्यांना बाबासाहेबांनी स्वत:च्या पक्षाचे सचिव नेमले. प्रचारप्रमुख नेमले. प्रवक्ता नेमले. आता आनंद यांनी एव्हढेच सांगायचे बाकी ठेवले की बाबासाहेबांनी ठेंगडींना आपला सर्वोच नेताच [बॉस] मानले.
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षाची घटना छापील आहे. ती आम्ही डाबाआंलेभा मालिकेच्या १७ व्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित केलेली आहे. या घटनेनुसार तीच व्यक्ती पक्षाचा सदस्य वा पदधिकारी होऊ शकते, जी अनुसुचित जातीची आहे. ठेंगडी काही अनुसुचित जातीचे नव्हते. शिवाय दुसर्या संघटनेचे सभासद असलेल्या व्यक्तीला ‘शेकाफे’चे दरवाजे बंद होते. ठेंगडी या काळात संघाचे, इंटक व रेल्वे व पोस्टल युनियन [कम्युनिस्ट] यांचे पदाधिकारी होते. आता अशा माणसाला नियमाप्रमाणे मुदलात ‘शेकाफे’चा सदस्यच होता येत नव्हते. पदाधिकारी तर फार दूरची बात.
आनंद म्हणतात, ‘बाबासाहेबांनी संघाच्या पुण्यातील शिबिरांना दोनदा भेटी दिल्या, तिकडे बाबासाहेब जेवले, त्यांनी संघाचे कौतुकही केले. इ. इ.’ बाबासाहेबांच्या या भेटीची छायाचित्रे, पत्र्यव्यवहार, त्याच्या बातम्या यांची कात्रणे यातले काहीही संघातर्फे पुरावा म्हणून दिले गेलेले नाही. १९२७ पासून बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये छापल्या जात. संघाच्या शिबिरांना बाबासाहेबांनी जर खर्याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही. संघाचे आणि केसरीचे गुळपीठ होते. बाबासाहेब याच काळात लोकमान्य.टिळकांच्या मुलाला श्रीधरला भेटत असत. त्यांचा पत्र्यव्यवहार आहे, बातम्या आहेत, मग संघाच्या भेटीच्या बातम्या निदान केसरीत तरी यायला हव्या होत्या. संघाला मानणारी या काळात निदान डझनभरतरी पुणेरी वर्तमानपत्रे होती. त्यातही खबरबात नाही, असे का? संघाने या भेटींचे पुरावे द्यावेत, ते तपासून ठरवू.
आनंद म्हणतात, ‘संघसुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले आणि त्यांना बाबासाहेब म्हणाले संघ वाढवा.’ प्रत्यक्षात काय घडले होते?
मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले होते हे खरे आहे. बाबासाहेब तेंव्हा देशाचे कायदा मंत्री होते. मंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. गुरूजी भेटले. त्यांनी मदत मागितली, सहकार्य मागितले, पण रा.स्व. संघ हा विषवृक्ष आहे असे, सांगत बाबासाहेबांनी सहकार्य नाकारले.
मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन ते बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले होते.
बाबा्साहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. “पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवाईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,” अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.
बाबासाहेब – गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री, हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जात-येत असत. गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, “हे ब्राहमण गृहस्थ, हिंदूंचे पोप आहेत. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!” { पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५} या भेटीची जनतामध्ये बातमीही प्रकाशित झाली होती.
चातुर्वर्ण्याची प्रस्थापना आणि संवर्धन करणार्या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील? दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषय पत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?
बरं याच काळात संघाचे काय उद्योग चालले होते, तर संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत घुसले होते.
शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून, हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? यालाच हे संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा ते सन्मान करीत होते असे म्हणतात का?
(वाचा-) “संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले, की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात.” (संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९)
सुर्यवंशी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाने लिहिले आहे, की बाबासाहेब घटना सभेत निवडून यावेत यासाठी जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणले. किती सराईतपणे खोटे बोलतात हे संघीय. मुदलात श्यामाप्रसाद यांनाच काँग्रेसने निवडून आणले होते. त्यांचा अन्य कुणीही सदस्य नव्हता. बाबासाहेब प्रथम निवडून आले, ते बंगालमधून. जोगेंद्रप्रसाद मंडल हे बाबासाहेबांचे तिथले आमदार होते. त्यांनी बाबासाहेबांना घटना परिषदेवर निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पुढे बाबासाहेबांचा हा मतदार संघ पाकीस्तानात गेल्याने बाबासाहेबांचे सदस्यत्व गेले. पण पुण्याचे बॅ. जयकर हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे राहावे अशी विनंती राजेंद्र प्रसाद व वल्लभभाईंनी त्यांना केली. याकाळातील सगळा पत्र्यव्यवहार उपलब्ध आहे. ही गोष्ट आहे, जुलै १९४७ ची. तेंव्हा जनसंघ नव्हताच, आणि त्यामुळे त्यांचा कोणी सदस्यही नव्हता.
खुद्द माझ्याबद्दलसुद्धा या सूर्यवंशींनी काही भन्नाट शोध लावलेत, म्हणे मी संघाच्या कार्यक्रमांना गेलो आणि तिथे संघाचा गौरव केला. साफ खोटे. मी आजवर संघाच्या एकाही कार्यक्रमाला गेलेलो नाही. गौरवाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही. माझे महात्मा फुल्यांवरील [ संघाच्या बाळ गांगलचा प्रतिवाद करणारे ] पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला माझ्या पिंपरीच्या घरी नवले नावाचे एक गृहस्थ भेटायला आले. ते म्हणाले, महात्मा फुले शताब्दी निमित्त आम्ही मुंबईत एक वैचारिक चर्चासत्र घेतोय, तुम्ही फुल्यांवर पेपर वाचा. मी गेलो.पेपर वाचला. आयोजक संस्थेचे नावही तोवर मी ऎकलेले नव्हते. त्यांनी त्याची पुस्तिकाही छापली आहे. माझा पेपरही त्यात आहे. पुढे त्यांनी असेच दुसरे चर्चासत्र नाशिकला घेतले. तिथेही मला बोलावले. मी म. फुल्यांवर बोललो. मात्र तेंव्हा मला संशय आला. मी खोदून खोदून माहिती काढल्यावर कळले, की ‘समरसता मंच’, या नावाने वावरणारी ही मंडळी संघाशी संबंधित आहेत. माझ्यापासून खरी माहिती दडवून ठेऊन माझी फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना फटकारले आणि त्याउप्पर त्यांना माझ्या दारातही उभे केले नाही, या गोष्टी फुले शताब्दी वर्षातल्या म्हणजे ३० वर्षांपुर्वीच्या आहेत.
आता तर हे लोक माझ्याच तोंडात संघाचे मी कौतुक केल्याचे शब्द घुसवू लागलेत! या खोटारडॆपणाचा, बुद्धीभेद अभियानाचा आणि फुले-आंबेडकरांचे अपहरण करण्याच्या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. मी संघाशी संबंधित असतो, तर संघाचे सरकार महाराष्ट्रात असताना मला राज्य शासनाच्या मागासवर्ग आयोग, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, भाषा सल्लागार समिती, बालभारती, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन, या सर्व संस्थामधून देवेंद्र फडणवीस सरकारने मला काढून टाकले असते काय?
प्रा. हरी नरके, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.
The post संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी appeared first on द वायर मराठी.
सूर निरागस हो..
एक एप्रिलपासून वर्तमानपत्रं सुरू झाली. ताबडतोब एक दोन दिवसापासून ती तत्परतेने बंदही झाली. मग सहा तारखेपासून पुनः सुरू झाली. परंतु माझी आवडती शब्दकोडी सोडल्यास त्यात फक्त कोरोना – कोरोनाच होता! पण मोठ्ठा टोला हाणला कॉलनीतल्या दोन छोट्यांनी ! “आजी, तुम्ही कशा बाहेर पडलात? हं, आणि कोरोनाबद्दल अजिबात बोलायचं नाही हां. बोsssर झालोय आम्ही.” “नाही बाबा बोलत, पण तुम्ही आत जा बघूं!” असं मी म्हणेपर्यंत त्यांना घरातून हाका आल्याच.
तुमचंही तेच झालं असणार म्हणून मी वेगळ्याच छान विषयाकडे वळते. तरुण आईबाबांना आणि असलेच त्यांच्याबरोबर त्यांचे आईबाबा, तर त्यांनाही आवडेल. लहान मुलांसाठी संगीत हा आजचा विषय.
बालसंगीत
मानवी मनाच्या पहिल्या आविष्कारासाठी संगीतकलेचा वापर झाला असे मानतात. हे खरंही असावं. लहान बाळ – अगदी तान्हं म्हणजे दोन – तीन महिन्यांचं – पाहता आल्यास ही गोष्ट सहज लक्षात येते. घशातून, तोंडातून चित्रविचित्र नाद काढत बाळ मजेत पहुडलेलं असतं. स्वतःसाठी स्वतःच संगीत निर्माण करीत असतं असं वाटावं इतकं त्यात ते दंग झालेलं आपण पाहतो. वेगवेगळे आवाज काढत ते हळूहळू शब्दांपर्यंत येऊन पोचतं आणि यथावकाश भाषा बोलूही लागतं. पण त्याधीच ते फुरफुर आणि बमबम असे आवाज करत तो त्याचा प्रथम आविष्कारच असतो. शिवाय तान्हेपणीच, ते गाण्यांतला आनंद अनुभवायला शिकतं. त्याशिवाय अंगाई गीतांची लयबद्ध निर्मिती झालीच नसती. आईचं गाणं गुणगुणणे बाळाला मनापासून आवडतं आणि सुखावह वाटतं.
गर्भातून बाहेर आल्यानंतर मूल श्वास घेतं, डोळे उघडतं आणि त्याचं इतर चलनवलन सुरू होतं. त्याचे कान मात्र गर्भावस्थेतही सक्षम असतात. कृष्णाने सांगितलेली चक्रव्युहाची कथा आणि गर्भावस्थेतही हुंकार देणारा अभिमन्यू आपल्याला माहित आहेच. पन्नास वर्षांपूर्वी डॉ. वेर्गीस नावाच्या अमेरिकन प्रसुतीशास्त्रज्ञ डॉक्टरांनी काही प्रयोग केले. त्यांचं म्हणणं असं आहे, की गर्भातील मूल सहा महिन्यांचं झालं की त्याला बऱ्याच गोष्टींच्या संवेदना होतात आणि त्याच्या कानाला तर खूपच गोष्टी ऐकू येतात. प्रसुतीपूर्वीच्या काळात रेकॉंर्डिंग करून त्यांच्या असं लक्षात आलं की मुलाच्या कानानं डॉक्टर-नर्सचे आवाज, उपकरणांचा खणखणाट, आणि मुद्दाम वाजवलेले शास्त्रीय संगीत, येवढं सगळं सहजतेने टिपलं होतं. हे सगळं लिहायचा उद्देश असा की श्रवणेंद्रिय हे फार लवकर तयार होत असतं आणि त्याच्याद्वारे मिळणारं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता मानवाच्या मुलात लौकर येते.
कानांचा – श्रवणेंन्द्रियांचा – आणखी एक विशेष असा आहे की ते सदैव, सर्वकाळ सजग असतात. सर्व दिशांकडून ध्वनी ग्रहण करण्याची क्षमताही त्यांच्यात असते. रात्री, दिवसा, जागेपणी आणि झोपेतसुद्धा आपल्याला आवाज ऐकू येऊ शकतात. डोळे जसे सहज बंद करता येतात तसे सहज कान बंद करता येत नाहीत. इच्छा असली तरी बंद करून घेता येत नाहीत. कानांच्या या वैशिष्ट्यांमुळे जसा आपल्याला त्रास होऊ शकतो, तसंच कानांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकते. श्रवण भक्ती नसलेल्या माणसाची अवस्था खरं म्हणजे अंधांहून बिकट असते. ते आपल्याला अजिबात खरं वाटतं नाही, त्यामुळे तर त्यांची समस्या जास्त तीव्र बनते. साधी गोष्ट घेऊ. अंधाबद्दल सर्वसाधारण माणसाला जेवढी सहानुभूती सहजतः वाटते, तेवढी बधिरांबद्दल वाटत नाही. उलट “ए बहिरटा” असं लोक सहज म्हणून जातात. शिवाय केवळ ऐकू न आल्यामुळे बोलता येत नाही हा एक गैरफायदा असतोच. कान हे अतिमहत्त्वाचं, ज्ञानसाधनेचं इंद्रिय आहे आणि मुलांना संगीतातून ज्ञानप्राप्ती होते हे मोठ्या माणसांना जेवढ्या लौकर कळेल तेवढं उत्तम.
आपल्या देशात, संगीत हे आपल्या विविध धर्मांसारखे आहे असं मला वाटतं. सगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानावर पडते, त्यातून मुलांच्या भाषेचा विकास होऊन त्यांच्या भाषेतून मिळणाऱ्या प्रतिमांचा, शब्दांचा, कल्पनांचा आकृतिबंध बालमनात तयार होत जातो. हे सगळं अगदी साध्या-साध्या गोष्टींनी तयार होतं जातं, आणि आपोआप होतं. मुळात लहान मुलांची छोटीछोटी गाणी त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देत असतात. अगदी लहान वयात खूप आणि वेगवेगळी गाणी ऐकणाऱ्या मुलांना बहुदाः आपली ओळी-दोन ओळींची गाणी तयार करण्याचा छंद जडतो. शिवाय येणाऱ्या गाण्यातल्या संगीतिकतेमुळे [म्युझिकॅलीटी] संगीत ह्या कलेशी अगदी बालपणी आपोआप नाते जडते. बालपणापासून जांच्या कानांवर संगीत पडते, त्यांच्यासाठी मग संगीत रसग्रहणाचे वर्ग मोठेपणी घ्यायला लागत नाहीत. जवळजवळ ९९% टक्के मुलांना संगीत ऐकायला आवडते असे मी आतापर्यंतच्या अनुभवावरून सहज म्हणू शकेन आणि जेवढे वय लहान तेवढे जास्तीत जास्त प्रकारचे विविध संगीत ऐकवावे, ऐकण्याची संधी मिळवून द्यावी असेही म्हणेन.
संगीतीकतेच्या जाणिवेबरोबर सहजतः गाणी म्हणता आली की व्यक्तीमत्वाविकासालाही मदत होते. आपल्या आवाजावर थोडीफार हुकुमत मिळवून आपण सादर करत असलेलं लहानसंच गाणं ह्यातून लहान मुलांना जो आनंद मिळतो, त्यानं साहजिकच त्यां मुलांना आत्मविश्वास येतो. त्याच्या गाण्याचे त्यानं चारचौघांसमोर येताजाता प्रदर्शन केलं पाहिजे असं अजिबात नाही. पण खेळता-खेळता, अंघोळ करताना, सायकल चालवताना, लहान मुलं स्वतःशीच गाणी म्हणत असतात, त्यावेळची त्यांची तन्मयता आणि त्याचा आनंद ह्यातूनही त्यांना आत्मविश्वास मिळतो. काहीकाही मुलांना आल्यागेल्यांसमोर अशी गाणी म्हणून दाखवण्याची हौस असते, नाही असे नाही. पण बहुसंख्य मुलांच्या आईबाबांना ही हौस जास्त असते. मारून-मुटकून मुलांना सभाधीट बनविण्याचे प्रयत्न करू नयेत. सभाधीटपणाखेरीजही अनेक गुण असतात.
लहान मुलांच्या गाण्याचा त्यांना होणारा एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्तीची वाढ. स्मरणशक्ती हा बुद्धिमत्तेचाच एक पैलू आहे आणि इतर अनेक पैलूंप्रमाणे तो महत्त्वाचा आहे. शिवाय तो घासूनपुसून लखलखीत ठेवून आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी वापरणं ह्यात कोणताही कमीपणा नाही. शिक्षणात येणाऱ्या नवनवीन प्रवाहांमुळे काही जुन्या परंतु उपयोगी गोष्टींची कुचेष्टा करण्याची फॅशन पडते आहे. त्यातच स्मरणशक्तीचा उपहास ही बाब येते. स्मरणशक्तीला घोकंपट्टी म्हणून कमी लेखण्यात येते. स्मरणशक्ती ही चांगलीच गोष्ट आहे. तिचा उपयोग कमीपणाचा किंवा उच्च ठरू शकतो. उदा. धड्यावरची प्रश्नोत्तरे पाठ करून लिहिणे हा स्मरणशक्तीचा दुरुपयोग आहे, परंतु पाढे, श्लोक, कविता, उतारे, नाटकातील वाक्ये पाठ करणे हा स्मरणशक्तीचा सदुपयोगच आहे. बाळपणी जी असंख्य गाणी मुलें शिकतात किंवा शिकू शकतात त्यांनी ह्या स्मरणशक्तीला व्यायाम होतो. बालगीतांमुळे, लहानपणी सतत गाणी गात राहिल्यामुळे, असंख्य गाणी शिकल्यामुळे स्मरणशक्ती पक्की होत जाते, तिला व्यायाम मिळतो.
गाण्यामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढत जातो. कित्येक नवनव्या शब्दांची ओळख मुलांना गाण्यातून सहजी होते. आपण गात असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलाला कळतो अथवा कळावा असा माझा दावा नाही. अजिबात नाही. परंतु अर्थाच्याही पलीकडे जाणारी एक प्रचीती असते, ती संगीतामुळे मुलाच्या मनात हळूहळू मूळ धरू लागते, त्या मुलाच्या मनोभूमितच आणखी मुळे फुटतात आणि ती मुलांच्या मानसिकतेत घट्ट बसून हळूहळू अर्थाचे धुमारे फुटतात. त्यामुळे ह्या वयात आपण जी काही गाणी, काव्ये, श्लोक, बालगीतं मुलांना शिकवितो ती मुलांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासावर परिणाम करतात असे मला वाटते.
एकदा पंडित भास्कर चंदावरकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाले, “कपडे, जेवण-खाण, दागदागिने, बाह्य-राहणी आणि भाषासुद्धा आपण इतरांकडून जितक्या सहजतेने आत्मसात करतो, तेवढ्या लवकर आपण इतरांचं संगीत घेत नाही. आपले संगीत आपल्या अस्मितेचा, व्यक्तीमत्वाचा अत्यंत आंतरिक मूळ गाभा असतो. ह्या बालगीतातून, लहानपणी ऐकल्या जाणाऱ्या आणि मनावर ठसणाऱ्या गाण्यातून सांस्कृतिक-अभिसरण होत असतं म्हणून भारतीय मुलांनी बालपणी आपल्या भाषेतील गाणी, हिंदी गाणी, जुन्या कविता आणि श्लोक, काही लोकगीतं, काही शास्त्रीय संगीत हे सगळं ऐकावं अशी माझी अपेक्षा असते.”
भाषाज्ञान, शब्द संग्रह याबरोबरच बालसंगीतामुळे मुलांना तालाचं आणि लयीचंही ज्ञान मिळते. असं म्हणतात की लय ही अंगभूत असते. ती शिकवून येत नाही. ताल शिकवता येतो. काही थोड्याच मुलांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांना लय जमत नाही. बहुसंख्य मुलांना इतरांबरोबर ताल पकडता येतो. परवा एका ठिकाणी मराठी संस्कृती जपण्यासाठी लहान मुलांना बालपणापासून मराठी बडबडगीत – गाणी शिकवायलाच हवी यावर चर्चा चालली होती. मुळात आपण संस्कृतीला जपत नसून संस्कृती आपल्याला जपत असते असं मला वाटतं. त्या चर्चेत भाषाज्ञान, शब्दसंग्रह आणि संगीत ह्या मुद्यांवर मी बोलायला लागल्यावर तिथल्या अधिकारी व्यक्ती मला म्हणाल्या, “हे सगळं नको बरं का, आपण त्या गाण्यांचा मराठी संस्कृतीशी कसा संबंध आहे एवढ्यापुरतच बोलायचं.” शेवटी संस्कृती म्हणजे काय? ती प्रामुख्याने आपल्या भाषेशी निगडीत आहे, ती भाषा आपण कशी बोलतो, कशी वापरतो हिच्याशी संस्कृतीचा अविभाज्य संबंध नाही का?
कधी कधी मला गम्मत वाटते – गम्मत की विषाद कोण जाणे – की हल्ली कित्येक तीन वर्षांच्या मुलांना “ये रे ये ये पावसा” गाणं म्हणता येत नाही की जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. ह्यातल्या कशात संस्कृती आहे नि कशात नाही म्हणायचं?
मला खूप वाटतं की मराठी मुलांना बालपणापासून “अडगुलं-मडगुलं”, “इथे इथे बस रे मोरा”, “ही माझी सोन्याची सखुबाई बरं का”, “अटक-मटक चवळी चटक”सारखी बडबडगीतं आणि गाणी कानावर पडावीत. या वयात ऐकू आलेलं सगळं; मुलं पटकन उचलतात, म्हणतात. लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेतले थोडं जुनं काव्य, जे सहज गेय असेल, ते शिकवावं असंही मला वाटतं. म्हणजे मुलांना गाणी, बडबडगीतांच्या बरोबरीने मोरोपंतांची आर्या, बहिणाबाईंची ओवी आणि तुकारामाचा अभंग बालपणीचा शिकवावा. तीन वर्षांचं मूल हे सहजपणे आणि आनंदाने म्हणते, फक्त ते कानावर पडायला हवे. आमच्या बालशाळेतील पाच-साडेपाच वर्षाची दोनशे मुलं ज्ञानेश्वरांचे पसायदान एकेकट्याने किंवा सगळ्या वर्गाबरोबर अगदी सहज म्हणतात. मी जर मद्रासच्या शाळेत शिकवत असते तरी तिथल्या मुलांनी बालपणी सुब्रमण्यम भारतीयार याचं थोडं तरी काव्य पाठ करावं असा हट्ट धरला असता. आमच्या बालशाळेत ऑगस्टमध्ये दोन-सव्वादोन वर्षाची मुलं प्ले-ग्रूपमध्ये येतात. त्यांचा वर्ग सुरक्षिततेसाठी आणि विपुल जागेच्या अभावी पहिल्या मजल्यावर आहे. त्यांना खेळताना जास्त उन्ह लागू नये म्हणून शाळेच्या मागच्या अंगणात आम्ही एक छोटंसं स्पेस-structure [मध्ये खांब नसलेलं छप्परवजा बांधकाम] बांधलेलं आहे. त्या जागेला आपण सगळ्याजणी “स्पेस-structure” असेच म्हणत जाऊ म्हणजे मुलंही आपोआपच म्हणतील असं ठरवून आम्ही तसाच उल्लेख करत असू आणि खरोखरच दोन- अडीच वर्षाची बहुसंख्य मुलं त्या जागेला सर्रास “स्पेस-structure” असं अगदी व्यवस्थित म्हणत असत. ज्यांना ऐकून-ऐकून “स्पेस-structure” असं म्हणता येतं त्यांना “सुसंगति सदा घडो” म्हणता येणार नाही का? चांगले शब्द सुस्वरासाहित मुलांच्या तोंडी रुळले की त्यांना शब्दाचं सौदर्य आणि नादमाधुर्य कळायला लागते. हळूहळू वाढत्या वयाबरोबर भाषेचा अर्थ प्रतीत व्हायला लागतो.
मधला मराठीच्या दृष्टीने खंडित झालेला प्रवाह पुढे न्यायचा असेल तर घरातून प्रयत्न व्हायला हवेतच, आणि शाळा ह्या परिणामकारक संस्थेने त्यात भाग घेतलाच पाहिजे असं मला वाटतं.
प्रत्येक बालशाळेने सुंदर पारंपरिक गीतं आणि बडबडगीतं मुलांपर्यंत पोचवायलाच हवीत. हल्ली प्रत्येक बालशाळांतून “ट ला ट, री ला री” “जन म्हणे काव्य करणारी” अशा कवियित्रींच उदंड पीक आलंय. गरीब बिचाऱ्या बालकांच्या कानांवर आणि मनांवर या बाया आपली सुमार गाणी आणि भिकार कविता थोपत असतात. त्यांना आवर घालायचा कोणी? त्यातला एखादीचे एखादं गाणं चांगलं असतं पण एकंदरीत काव्यगुण आणि गीतसंगीत पाहू गेल्यास आनंदच असतो! जुनी, पारंपरिक, किंवा नवी चांगली खूप गाणी-गीतं शिकवल्यानंतर एखादं आपलं गीत, कविता शिकवायला हरकत नाही. परंतु सदानकदा नवीच गाणी मुलांच्या माथी मारली, तर ज्याला आपण आपलं सांगीतिक काव्यधन म्हणतो, त्याचा वारसा मुलांपर्यंत पोचणार कसा? शिवाय आपल्याकडे विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पदकी, लीला भागावत यांच्यासारखे मुलांसाठी उत्तम गीत लिहिणारे कवी-कवयित्री आहेत. त्यांच्या गीतांची भर जुन्या गाण्यात घालून जर ती आपण मुलांना शिकवली ते ते खरं सांगीतिक आणि सांस्कृतिक अभिसरण होईल. “सारखं आपलं दर वर्षी ‘बा – बा – ब्लाकशिप’ असं शिकवून तुम्हला कंटाळा नाही का हो येत?” असा प्रश्न मला विचारला जातो. “Ba Ba Blackship’ आणि “Jack and Jill” सारख्या गाण्यांना “ये रे ये रे पावसा”, “चांदोबा चांदोबा भागलास का” ह्या गाण्यांसारखे वजन त्यांच्यातील अभिजातपणामुळे आलेलं असतं. ते प्रत्येक मुलापर्यंत पोचवणं, तो वारसा मुलांच्या हवाली करणं हे बालशिक्षिकेच एक उत्तरदायित्व असतं. “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात” सारखी उत्तम काव्य आणि संगीत असलेली गाणी हळूहळू “ये रे ये रे पावसा” सारख्या गीतांच्या पंगतीत जाऊन बसतात आणि हे सांगीतिक धन समृद्ध करीत असतात.
अशी ही बालशाळेतील तीन-चार वर्षाची सांगीतिक शिदोरी असते. ही शिदोरी जन्मभर पुरणार नाहीच, पण ही केवळ पायाभरणी आहे. अशा बाल संगीताच्या पायावर पुढची भक्कम उभारणी करता येणे शक्य आहे. त्यातून पुढे सांगीतिक आनंद, सृजनशीलता आणि आपली मराठी संस्कृती जोपासली जाईल.
मीना चंदावरकर या बालशिक्षणतज्ज्ञ असून, पुण्यातील अभिनव विद्यालय (इंग्रजी माध्यम) व न्यू इंडिया स्कूलमार्फत त्यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ४० वर्षे विविध उपक्रम चालवले आहेत.
The post सूर निरागस हो.. appeared first on द वायर मराठी.
एका हुकुमशहाची ऐशी तैशी !
‘इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला’
(रॉय किणीकर)
“तुझ्या आणि हिटलरच्या मिश्याची ठेवण एकदम सारखी आहे. “अलेक्झांडर कोर्डा चार्ली चॅप्लिनला म्हणाला. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या धर्तीवर चार्ली म्हणाला, ” हिटलरनेच माझ्या मिश्या चोरल्या.”
मिश्यांच्या साम्यावरून सुरू झालेल्या चर्चेतून हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यातील अनेक साम्य या दोघांना जाणवायला लागली. शरीरयष्टी, वजन, उंची इतकंच काय १८८९साली जन्माला आलेल्या या दोघांच्यात केवळ चार दिवसांचे अंतर चार्ली १६ एप्रिल तर हिटलर २० एप्रिलचा. (मृत्यू ३०एप्रिल) दोघांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले, दोघांचा भावनिक प्रवास न्यूनगंडातून आक्रमकतेत झालेला. पण दोघांच्या आक्रमकतेची धार परस्परविरोधी. एक जो आपल्या कलेतून आजही जगावर साम्राज्य करत आहे आणि एक ज्याने फाजील महत्त्वाकांक्षेपोटी स्वतःचा, जगाचा नाश केला.
चार्लीच्या डोक्यात कथाबीज रुजलं गेलं आणि त्याने बोनार्ड बेरकोविकीला घेऊन दोन वर्षे कथा, पटकथा यांवर काम केलं. विडंबन ते ही हिटलरसारख्या क्रूरकर्माचं ! जमलं तर सुदृढ हास्यविष्कार होईल नाही तर वाताहतीला आमंत्रण ! याची पुरेपूर जाणीव चार्लीला होती.
चार्ली चॅप्लिन हिटलरवर सिनेमा काढतोय समजल्यावर युनायटेड आर्टिस्ट, हॉलिवूड, अमेरिका, न्यू यॉर्क सर्वांनी उगाचच हिटलरशी पंगा घेण्याची गरज नाही, त्यामुळे अनाठायी रोष का ओढून घ्यायचा? असा भीती वजा इशारा चॅप्लिनला दिला. पण ऐकेल तो चार्ली काय? इतकं चांगलं कथानक त्याला वाया जाऊ द्यायचं नव्हतं. स्वतःचा स्टुडिओ आणि पैसा यांच्या साह्याने, आपल्या प्रतिभेच्या अस्त्राच्या जोरावर तो हिटलरशी सामना करायला सज्ज झाला.
त्याला आईने लहानपणापासून रुजवलेला मानवतावादी दृष्टिकोन सर्वत्र पोचवायचा होता. आपला हा सिनेमा बघून हिटलरचे हृदयपरिवर्तन कदाचित होऊ शकेल, असा (भाबडा) आशावाद त्याने आपल्या भावाजवळ बोलून दाखवला. झाले उलटंच चित्रपटाची प्रिंट मिळवून एकट्याने हा सिनेमा बघितल्यावर, हिटलरच्या अंगाचा तिळपापड झाला होता.
‘द ग्रेट डिक्टेटर’च्या कथानकाचा प्रभाव अगदी काल-परवापर्यंतच्या हिंदी सिनेमावर जाणवतो. दोन सारख्या चेहेऱ्याची माणसं. एक भला, एक बुरा. एक सामान्य ज्यू बार्बर पहिल्या महायुद्धात सक्तीच्या सैन्यभरतीमुळे युद्धावर गेलेला. नेहमीच्या ट्रॅम्पसारखी गोंधळ उडवून देणारी बार्बरची व्यक्तिरेखा. आपल्याही नकळत तो एका लष्करी अधिकाऱ्याचा जीव वाचवतो आणि अपघातात बेशुद्ध होतो. शुद्धीवर येतो, त्याला बराच काळ उलटून गेलेला असतो. तो आपल्या गावी परततो. मधल्या काळात खूप बदल झालेला असतो. ‘टोमानिया’ देशाच्या हुकूमशहा हिंकलची राजवट तिथे असते. या हिंकलचा चेहेरा बार्बरसारखा हुबेहुब दिसणारा. हिंकल अत्यंत आत्मकेंद्री, विषारी मनोवृत्ती असलेला हुकूमशहा असतो. हिटलरची देहबोली, मानसिकता पेश करताना चार्लीने परकाया प्रवेश केला आहे. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुन्दर.’ म्हणावसं वाटावं इतका अप्रतिम. लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर मग्रूर तितकाच नाटकी आविर्भावात जनतेच्या भावना भडकवणारा, भावनातिरेकामुळे मध्येच हंबरणारा, कर्कश आवाजात बोलणारा, जनतेच्या कमजोर मानसिकतेचा फायदा घेणारा हुकूमशहा उभा करतांना, त्याच्या क्षुद्र मनोवृत्तीच दर्शन दाखवायची एक संधी चार्ली चॅप्लिनने सोडली नाहीये.
दोन्ही पात्रातील फरक चार्लीने इतका अफलातून दर्शविला आहे की, आपण बघतानां बऱ्याचवेळा विसरून जातो की हे काम एकाच व्यक्तीने केलं आहे. पुढे हिंकलचे असुरी मनसुबे, जनतेची परवड. या परिस्थितीतही बार्बर व मैत्रिणी ऍना यांच्यातले फुलत जाणारं प्रेम. हिंकलची मत न पटणाऱ्या एक अधिकारी बार्बरला हाताशी घेऊन सत्तापरिवर्तन करू पाहतो पण त्याआधीच ती दोघे पकडली जातात. आणि ऍनाशी ताटातूट होते. मग अजून एका हुकूमशहाचं आगमन होत. मुसोलिनीवर बेतलेल्या या पात्राचं नाव नापालोनी. हिंकल आणि त्याच्यातील वरवरच्या मैत्रीच्या आड वर्चस्वाबद्दलची सुप्त चढाओढ सुरू असते. त्याचं रूपांतर शेवटी भांडणात होतं. पण जगाला टाचेखाली ठेवायचा दुष्ट हेतू, दोघांच्यात परत मैत्री व्हायला कारणीभूत ठरतो. दोघे मिळून अजून एक प्रदेश काबीज करतात. परराष्ट्र खात्याच्या गाठीभेटीच्या प्रदर्शनाची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.
इकडे बार्बर आणि तो अधिकारी जेल मधून सुटका करून घेतात. आणि नेमका त्यावेळी हिंकल सुट्टीवर गेलेला असतो. सैनिक हिंकलला बार्बर समजून पडतात आणि इकडे बार्बर हिंकलची जागा घेतो. हुकूमशहा अफाट जनतेसमोर भाषण करणार असतो. बार्बर सुरवातीला अडखळतो, गांगरतो पण मनातल्या सद्भावनां व्यक्त करतांना त्याला त्याचा नव्हे सर्वसामान्यांचा आवाज सापडतो. वैश्विक सत्याचे मर्म त्याच्या भाषणातून सर्वदूर झिरपत, पसरत जाते.
‘द ग्रेट डिक्टेटर’ काढतानां चार्लीने बारीकसारीक तपशीलांवर खूप भर दिला आहे. हिंकल भाषण करतो, तेव्हा त्याच्या कर्कश आवाजामुळे माईक सुद्धा घाबरून, दचकून मागे जातात. उंच स्टेजवरून खाली उतरत असतांना पायऱ्यांवरून हिंकल घरंगळत खाली येतो. अहंकारी माणसाचे अध:पतन व्हायला, तो स्वतःच कसा जबाबदार असतो, त्याची चुणूक दाखवली आहे. जनतेबद्दलचा कळवळा दाखवण्यासाठी गर्दीतल्या लहान बाळाला दांभिक हिंकल उचलून घेतो. अत्यंत प्रेमळ चेहऱ्याने, पोज देऊन फोटो काढतो. फोटो काढल्या काढल्या बाळाला परत करून त्रासिक चेहेऱ्याने हात साफ करतो. रस्त्यावर लोकं एक हात वर हिटलर खास स्टाईलची मानवंदना देत असतात तेव्हा दिसतात रस्त्याच्या बाजूला काही पुतळे. जगप्रसिद्ध ‘व्हेनिस द मिलो’ ( Venus de Milo) ग्रीक देवता जी प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, या स्टेच्युला एक हात बसवलेला आहे, ‘थिंकर’ पुतळा विचारवंताचे प्रतिनिधित्व करतो, तो ही एका हाताने मानवंदना करतांना दर्शविले आहेत. हुकूमशहा केवळ जनतेचीचं नव्हे तर कलावंताची, सौंदर्याची, प्रेमाची, विचारवंतांची कशी मुस्कटदाबी करतात, हे छोट्या, छोट्या गोष्टीतून दाखवलं आहे.
एका प्रसंगात हिंकल पत्र लिहून पाकिटात घालतो, तर पाकीट चिटकवण्यासाठी एक लाचार अधिकारी आपली जीभ बाहेर काढतो.
नापालोनीबरोबर खुर्ची उंच उंच करण्याचा अट्टाहास असो किंवा पृथ्वीच्या फुग्याबरोबर खेळत आत्मप्रौढीचं प्रदर्शन दर्शवणारे सीन्स तर जगप्रसिद्ध. आपल्या राजप्रसादात वेगवेगळ्या दालनात वेगवेगळ्या गोष्टी करत असताना अस्थिर, चंचल मनाचा, आत्मलुब्ध व्यक्तिमत्वचा हिंकल रंगवताना चार्ली चॅप्लिनची प्रतिभा ओसंडून गेली आहे. ऑफिसच्या कपाटाच्या आत वस्तू, फाईल नव्हे तर वेगवेगळ्या अँगलने आरसे बसवले असतात. कामं सुरू असतांना मध्येच कपाट उघडून स्वप्रतिमा न्याहाळत बसणारा नार्सिसीस्ट डिसऑर्डरने पछाडलेला हुकूमशहा.
‘आरशात पाहती कोण कोणाचे रूप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरूप
बघ गेला पारा फुटला आरसा जाड
दिसले रे दिसले ‘ अरुप’ आरशाआड’
(रॉय किणीकर)
हिटलरचे हे ‘अरुप’ जगापुढे आणण्याची हिंमत फक्त एकांडा शिलेदार चार्ली चॅप्लिनचं करू शकला.
नकली हिंकलचे (बार्बरचे) शेवटचं नऊ मिनिटांचे भाषण हा मानवतावादी भूमिकेचा अर्क आहे. अजूनही ती मानवतेची हाक जगाला उपयोगी आहे, हे मात्र आपलं दुर्दैव! कुठलाही अभिनिवेश नसलेलं भाषण करतानां चार्लीचा सद्सद्विवेकी सच्चा चेहरा दिसतो. विश्वशांतीचा संदेश पोचवण्याची इतकी जास्त तळमळ चार्लीत होती की त्याने ते भाषण हजारवेळा ऐकलं.. त्यात दुरुस्ती केल्या. लोकांच्या अंत:करणात समानतेचा, लोकशाहीचा, शांततेचा प्रकाश पोहचायला हवा, त्यासाठी त्याची धडपड समजून घ्यायला हवी.
‘द ग्रेट डिक्टेटर’ हा चार्ली चॅप्लिनचा पहिला बोलपट. चित्रपटाला आवाजाची जोड मिळाली तरी चार्ली चॅप्लिनने आपल्या चित्रपटाला मूक ठेवणं पसंद केलं होतं. चेहेऱ्याची भाषा ही सर्वाना समजणारी, भाषेची जोड दिली तर मर्यादा येते, असे चार्लीचं मत होतं. पण आपलं मत चार्लीने ‘द ग्रेट डिक्टेटर’बाबत बाजूला ठेवलं.
मूळ ९ मिनिटांचे भाषण ऐकणं ही विवेकी मेजवानी आहे.
भाषणाचा सारांश – “मला माफ करा, मला सम्राट व्हायचं नाही, ती माझी इच्छा ही नाही, खरं तर ते माझं काम नाही. मला कोणावर हुकूमत, आक्रमण करायचं नाही. उलट मनुष्यजातीला मदत करायला मला आवडेल, ते करतांना मी ज्यू किंवा काळे- गोरे असा भेदभाव करणार नाही. कोणाचाही द्वेष, मत्सर करता कामा नये, ही भूमी सर्वांची आहे. लोभाने माणसाचे आत्मे पोखरलेत, जगभर द्वेष पसरलाय. माणसाने गती वाढवली पण तो स्वतःच कैद झाला, ज्ञानामुळे आपण खूप विचार करायला शिकलो आणि माणुसकी विसरलो. यंत्रापेक्षा मानवतावादाची जास्त गरज आहे. बुद्धिमत्तेपेक्षा दयाळूपणा आणि सभ्यता याची जास्त गरज. त्याच्या नसण्याने आयुष्य आणि पर्यायाने मानवजात संपून जाईल. माणसाला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल असे जग आपल्याला हवं आहे. एकत्र येऊ. तुम्ही दुष्ट लोकांची साथ देऊ नका. जे तुम्हाला तुच्छ लेखतात, गुलाम समजतात. शिस्तीच्या नावाखाली तुमचं विचारस्वातंत्र्य हिरावतात, लोकांचा द्वेष करायला लावतात अशा स्वार्थी लोकांना साथ देऊ नका. आपण मानवतेसाठी आणि लोककल्याणासाठी एकत्र येऊ.. एकजुटीने जगू..”
पडद्यावर काळ्या ढगाच्या आडून सूर्याची किरणे चमकत असतात, आकाश निरभ्र होत जातं.. पांढऱ्या रंगाने पडदा व्यापतो.. विश्वशांतीचा पांढरा झेंडा आपल्या मनात फडकवत राहतो..
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.
The post एका हुकुमशहाची ऐशी तैशी ! appeared first on द वायर मराठी.
अर्णव प्रकरणात प्रेस कौन्सिलचा हस्तक्षेप पक्षपाती!
टीव्ही अँकर अर्णब गोस्वामी यांच्यावरील कथित हल्ल्याची स्वयंस्फूर्तीने (सुओ मोटो) दखल घेत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) गुरुवारी महाराष्ट्र सरकारला मुख्य सचिव व मुंबई पोलिस अायुक्तांमार्फत या प्रकरणातील तथ्यांशी निगडित अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
“कौन्सिल या हल्ल्याचा निषेध करते आणि सरकार त्वरित गुन्हेगारांना पकडून न्यायालयापुढे हजर करेल अशी अपेक्षा करते,” असे कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. “चुकीच्या पत्रकारितेविरोधातही हिंसाचार हे उत्तर असू शकत नाही,” असे पीसीआयने नमूद केेले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला, यात पत्रकारांचाही समावेश होतो, आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे मत अनेकांना रुचणारे नसले तरी त्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही पीसीआयने म्हटले आहे.
गोस्वामी यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, दोन मोटरसायकलस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. गोस्वामी या वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यांचे सुरक्षारक्षक त्यांच्या मागून स्वतंत्र वाहनातून येत होते. त्यांनी नंतर कथिक हल्लेखोरांना अटक केली. आपण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आणि ‘वरून ऑर्डर्स आल्यामुळे’ हल्ला करत आहोत असेही पकडलेल्यांनी आपल्या सुरक्षारक्षकांना सांगितल्याचा दावा गोस्वामी यांनी केला आहे.
पीसीआयने पत्रकारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त करणे किंवा राज्य सरकारला अहवाल सादर करण्यास सांगणे यात वरकरणी वेगळे असे काहीच नाही. अखेर पीसीआयची स्थापनाच “माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आणि भारतातील वृत्तपत्रे व वृत्तसंस्थांचे मानक सुधारण्यासाठी तसेच राखण्यासाठी” करण्यात आली होती. मात्र, प्रेस कौन्सिल कायदा, १९७८नुसार प्रेस कौन्सिलचे अधिकारक्षेत्र वृत्तपत्रे व वृत्तसंस्था यांच्यापुरते मर्यादित आहे हेही अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे.
म्हणूनच, जर पीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप करणे अपेक्षित नव्हते, तर तिने हे का केले हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. सहसा कौन्सिल अशा प्रकरणांत, विशेषत: टीव्ही (इलेक्ट्रॉनिक) माध्यमांच्या प्रकरणांत, लक्ष घालत नाही. गेल्या काही महिन्यांत आणि वर्षांत अनेक पत्रकारांवर हल्ले झाले, सरकारी तसेच बिगरसरकारी शक्तींनी त्यांना लक्ष्य केले. मात्र, गोस्वामी यांच्या प्रकरणात कौन्सिलने जेवढा चपळाईने हस्तक्षेप केला, तेवढा या सर्व प्रकरणांत केल्याचे आठवत नाही. “इलेक्ट्रॉनिक माध्यमे, टीव्ही वृत्तवाहिन्या, व्हॉट्सअॅप/ट्विटर/फेसबुक आदी सोशल मीडिया प्रेस कौन्सिलच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत” असे पीसीआयने अगदी अलीकडेच स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा संबंध तबलिगी जमातशी जोडून धार्मिक तेढ पसरवणाऱ्या माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करणाऱ्या एका मुस्लिम संस्थेच्या अर्जावर हंगामी आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर एकच दिवसात प्रेस कौन्सिलने हे स्पष्टीकरण जारी केले होते. आम्ही माध्यमांवर नियंत्रण आणू शकत नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पीसीआयकडे जाण्याचा सल्ला दिला होता. पीसीआयपुढे बाजू मांडा, त्यानंतर आम्ही हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ, असे न्यायालयाने म्हटले होते.
त्यावेळी कौन्सिलने दिलेल्या स्पष्टीकरणात तांत्रिकदृष्ट्या चुकीचे काहीच नाही. मात्र, गोस्वामी प्रकरणात केलेल्या हस्तक्षेपामुळे पीसीआयचा दुटप्पीपणा दिसून येतो. प्रेस कौन्सिल कायद्याने घालून दिलेल्या कार्यक्षेत्र व प्रक्रियांची फारशी पर्वा कौन्सिलला नाही, ती तिच्या प्राधान्यक्रमांनी चालते हे यातून दिसून येते.
लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी कौन्सिलने स्वयंस्फूर्तीने दखल घेऊन कारवाई केली होती ती द टेलीग्राफ या इंग्लिश वृत्तपत्राविरोधात. हे वृत्तपत्र त्यांच्या प्रस्थापितविरोधी भूमिकेसाठी ओळखले जाते. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नामांकनाबाबतच्या वृत्ताचे शीर्षक या वृत्तपत्राने “कोविंद, नॉट कोविड, डिड इट” असे दिल्यावरून कौन्सिलने वृत्तपत्राला नोटिस बजावली होती. अशा शीर्षकामुळे पत्रकारितेच्या आचारसंहितेचा भंग होतो, असे कौन्सिलने म्हटले होते. खोट्या बातम्या किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्या अनेक वृत्तपत्रांविरोधात मात्र कौन्सिलने हस्तक्षेपाचे कष्ट घेतलेले दिसत नाही. गेल्या काही आठवड्यांत तबिलगी जमात संमेलन आणि एकंदर मुस्लिम समुदायाबाबत कोविड-१९संदर्भातील बनावट बातम्या, चुकीची माहिती व प्रचारात बेसुमार वाढ झाली आहे. केवळ टीव्ही वाहिन्या आणि सोशल मीडियाद्वारे नव्हे, तर वृत्तपत्रांद्वारेही चुकीची माहिती पसरवली गेली आहे. उदाहरणार्थ, विपुल खप असलेल्या अमर उजाला या हिंदी दैनिकात ५ एप्रिल रोजी, तबलिगी जमातच्या सदस्यांनी सहारणपूरमध्ये मांसाहारी जेवणाची मागणी केली आणि विलगीकरण आस्थापनात उघड्यावर शौच केले असा वृत्तांत पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनीच हा दावा खोटा ठरवला. त्याचप्रमाणे मेरठमध्ये दैनिक जागरण या वृत्तपत्रातही धार्मिकदृष्ट्या प्रक्षोभक अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अन्य भाषांतील वृत्तपत्रांमध्येही ‘पत्रकारितेच्या आचारसंहितेचा भंग’ नियमितपणे होत आला आहे. या मुद्दयांची दखल घेण्याची गरज पीसीआयला वाटत नाही हे मोठे रोचक आहे.
कश्मीरमधील तीन पत्रकारांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही पीसीआयने मौन बाळगले आहे. यातील एक पत्रकार हिंदू या वृत्तपत्राचा वार्ताहर आहे. म्हणजे हे प्रकरण थेट पीसीआयच्या कार्यक्षेत्रातील आहे. बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यासारख्या अन्याय्य कायद्याखाली लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल कौन्सिलने काहीही पावले उचलेली नाहीत.
प्रेस कौन्सिल कायदा, १९७८च्या १४व्या कलमाने कौन्सिलला “एखादे वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्थेने पत्रकारितेच्या मानकांचे किंवा जनअभिरुचीचे उल्लंघन केल्याबाबत किंवा एखाद्या संपादकाने अथवा पत्रकाराने व्यावसायिक गैरवर्तन केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास किंवा कौन्सिलला तसे आढळल्यास संबधित वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्थेला किंवा संपादक अथवा पत्रकाराला इशारा देण्याचा, सल्ला देण्याचा किंवा त्यावर बंधने लादण्याचा (सेन्सॉर), त्यांच्या वर्तनाबद्दल नामंजुरी देण्याचा” अधिकार आहे.
यासंदर्भात पत्रकारांच्या हक्कांचे आणि पत्रकारितेच्या नियमांचे संरक्षण करण्यात कौन्सिल पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. हे केवळ अन्याय्च नाही, तर पीसीआयच्या स्थापनेचा उद्देशच निरर्थक ठरवणारे आहे. गोस्वामी यांच्या प्रकरणात जी तत्परता कौन्सिलने दाखवली ती अन्य प्रकरणांतही दाखवणे गरजेचे आहे. कायद्याच्या क्षेत्रात एक जुनी म्हण आहे- न्याय होणे आवश्यक आहे तेवढेच न्याय झाला आहे हे दिसणेही आवश्यक आहे.
मूळ लेख
The post अर्णव प्रकरणात प्रेस कौन्सिलचा हस्तक्षेप पक्षपाती! appeared first on द वायर मराठी.
अमेरिकेत व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक बळींची भीती
गेल्या तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने अमेरिकेत सुमारे ५० हजार रुग्ण दगावले आहेत आणि सध्या या विषाणूचा संसर्ग पाहता पुढील आठवड्यात हा आकडा अजून काही हजारांत वाढत जाईल. ७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे सुमारे ५८ हजार सैनिक मरण पावले होते, त्यापेक्षा अधिक अमेरिकी नागरिक कोरोना विषाणू साथीत बळी पडण्याची भीती आहे. व्हिएतनाम युद्ध सुमारे एक दशक लढले गेले होते, पण कोरोनाविरोधातील केवळ तीन महिन्याच्या लढाईत अमेरिकेला हजारोच्या संख्येत आपल्या नागरिकांना गमवावे लागले आहे.
अमेरिकेची आर्थिक सुबत्ता, तेथील उत्तम आरोग्य व्यवस्था, जगातील उत्तमोत्तम वैज्ञानिक, डॉक्टर, संसोधन संस्था दिमतीला असूनही ट्रम्प प्रशासनाला वाढत्या मृत्यूची संख्या रोखता आलेली नाही.
५०च्या दशकातल्या कोरिया युद्धात अमेरिकेने ३५ हजार सैनिक गमावले होते. तो आकडा कोरोनाच्या साथीत अमेरिकेने केव्हाच मागे टाकला आहे. आता कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून पुढील काही महिने मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत जाईल, असे नॉर्थइस्टर्न विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.
१ मार्चला न्यू यॉर्कमध्ये कोरोना साथीची लागण झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती, त्यानंतर या शहरात कोरोनाची लागण झालेले २,६३,४९० रुग्ण असून १५,७४० रुग्णांचा मृत्यू तर २३,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. या घडीला १५,०२१ रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहे. न्यू यॉर्कमध्ये कोरोनाची चाचणी न झालेले अन्य ५,१२१ नागरिकही मृत्यू पावले आहेत पण त्यातील बहुतांश नागरिकांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता आहे.
अमेरिकेत आता कोरोनामुळे मृतांचा आकडा असा वाढत गेला तर युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेला जेवढी झळ बसली होती त्यापेक्षा अधिक झळ सोसावी लागणार आहे.
युद्धाच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळलेली नव्हती किंवा बेरोजगारी दराने सर्वोच्च पातळी गाठली नव्हती पण आता तसे चित्र राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या ७० लाख १४ हजार इतकी झाली आहे तर रोजगाराची संख्या २० लाख ९९ हजाराहून १५ लाख ५७ हजार अशी घसरली आहे.
अमेरिकेतील १६.२ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष रोजगारक्षम आहे. हा आकडा गेल्या तीन महिन्यात घसरत चालला आहे. २००९च्या आर्थिक मंदीत अमेरिकेतील बेरोजगारीचा दर १० टक्के होता तर १९३३च्या आर्थिक महामंदीत हा आकडा २४.९ टक्के इतका होता. पण आता कोरोनामुळे तीन महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबर हादरे बसल्याने बेरोजगारी वेगाने वाढेल असे चित्र आहे.
अनेक बड्या कंपन्यांनी आपले ताळेबंद मांडण्यास सुरवात केली आहे. अनेक कर्मचार्यांच्या नोकर्यांवर गदा आली आहे. कोणीही या घडीला भविष्य काय असेल याचा अंदाज बांधू शकत नाही.
सीएनएन, यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिकवर आधारित.
The post अमेरिकेत व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक बळींची भीती appeared first on द वायर मराठी.
लॉकडाऊन आणि एकल महिला
आज भारतात सात कोटींवर एकल महिलांचे प्रमाण आहे. एकल महिलांचे प्रमाण सर्वाधिक असणार्या राज्यात महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर आहे. एकल महिलांची स्थिती आपल्या समाजात मुळातच सहजी स्वीकारली जात नाही. शहरी भागात थोड्या फार प्रमाणात का असेना काही तरी काम मिळण्याची शाश्वती असते. पण ग्रामीण भागात राहणार्या एकल महिलांच्या बाबतीत ही शाश्वती खूपच कमी प्रमाणात असते.
ग्रामीण भागात रोजगाराच्या कमी संधी यातून बहुतांश महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुसरे कुठले काम सुरू करायचे म्हटले तरी या पर्यायाचा फारसा विचार करता येत नाही. शिवाय मुलांच्या जबाबदारीचा गाडा या महिला एकट्याने रेटत असतात. ९०% महिलांचे रोजीरोटी कमावण्याचे माध्यम हे शेतमजुरी, घरगुती गोळ्या-चॉकलेटचे दुकान, भाजीपाला विक्री, बिगारी काम किंवा मनरेगा रोजगार हमी योजनेत जर कधी काम मिळाले तर हे असते. काहीजणी जर गावात कुठला समारंभ असेल तर त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचे काम करतात. या सगळ्या कामाची मजुरी पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्याचे दिसून येते. बचत गटांनी ग्रामीण भागातील महिलांना सक्षमपणे जगण्याचे एक साधन मिळाले आहे. ज्या काही महिला बचत गटाच्या सदस्य आहेत त्यांना गटाच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी मोलाची मदत होते. अशा सगळ्या स्थितीत ग्रामीण भागातील एकल महिला आपले कुटुंब चालवितात.
कोरोनामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन सरकारने घोषित केला. त्यामुळे सगळे व्यवहार जागच्या जागी थांबले. घरात जे काही आहे त्या धान्यावर या महिलांनी आपले कुटुंब गेल्या १५ दिवस सांभाळले. आता घरातील डबे खडखडू लागले आहेत. रोज कमावलं तर मुलांना दोन घास मिळण्याची शाश्वती असते. आज लॉकडाऊनचा चौथा आठवडा आहे. गावात कामधंदे ठप्प झाले आहेत. उन्हाळ्यात शेतीत काम मिळण्याचे प्रमाण कमी असते. काही न काही काम मिळत असते. कोणी चिंचा झोडणीचे काम करतात, कोणी कांदा काढणीचे काम करत असतात, कोणी गहू सोंगनीच्या कामात असतात तर काही महिला गावातील लग्न समारंभ, हरिनाम सप्ताह यात स्वयंपाकाचे काम करत असते. त्यामुळे हातात काही ना काही मिळकत येत असते. म्हणून जीवन सुसह्य होते. आता ३ मे नंतर लॉकडाऊन शिथिल जरी झाला तरी काम मिळेल याची खात्री नाही.
मराठवाड्यातील आशा एकल महिला मंचची सदस्य असलेल्या सुनीता सांगतात, ‘लॉकडाऊनमुळे गावातील ४०-४५ कुटुंब जी कामासाठी शहरात गेले होते ती कुटुंबे पुन्हा गावाकडे परत आले आहेत. त्यामुळे आम्हाला काम मिळेल का नाही याची धास्ती पडली आहे. आता रेशनवर धान्य मिळतं आहे. त्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. पण हे धान्यही फक्त ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच दिले जात आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा महिलांनी काय करायचे हा प्रश्न आहे.
लॉकडाऊनमुळे एकल महिला, कष्टकरी समुदाय यांच्यासमोर जीवनमरणाचे प्रश्न उभे राहिले आहे. शहरातील लोकांनी गावाकडची वाट धरल्यामुळे गावातील अर्थव्यवस्थेवर दुहेरी ताण पडणार आहे. एकल महिलांचे प्रश्न पुन्हा वाढणारचं आहे.
देशात जन धन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी बँकेत तुफान गर्दी झालेली दिसून येत आहे. यावर सोशल मीडियावर आलेले कमेंट्स कोरोनाचा प्रसार वाढविणारी चिंता व्यक्त करणारे होते. गर्दी टाळली पाहिजे हे मान्यच आहे पण ज्या लोकांचे हातावर पोट आहे. त्यांच्यासाठी हे ५०० रुपये बुडत्याला काठीचा आधार असल्यासारखे आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळ समजावून घेताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लीलाबाईच्या फोनमुळे कालचक्र पुन्हा मागे गेल्याच जाणवलं. लीलाबाई अंदाजे वय ६०च्या आसपास असेल. दारूच्या व्यसनामुळे पतीचे अकाली निधन झाले. दोन मुलांना मोठे केले, पण त्यांनी लीलाबाईंना सोडून स्वत: वेगळा संसार थाटला. लीलाबाईंनी खचून न जाता पोट भरण्यासाठी गावाच्या गरजेप्रमाणे ठोक भावात माल खरेदी करून त्याची विक्री करू लागल्या. गावामध्ये ऊसतोड कामगार येतात. तेव्हा गावात भाजीपाल्याची गरज भासते. यावर्षी ऊसतोड मजूर आले मात्र प्रमाण कमी होते. त्यामुळे तोडीचे काम ४ महिने चालायचे ते १ महिन्यातच संपले. त्यामुळे आता कोणती वस्तू विकायची आणि उदरनिर्वाह कसा पार पडायचा ही चिंता होती. दुष्काळामुळे गावात मजुरी नाही. शाळा बंद, जी विक्री होऊ लागली त्यातही उधार मागणार्याची संख्या अधिक होती. तालुक्यातून आणलेला माल विकला गेला नाही तर आपण मागची बाकी देऊन पुढचा माल कसा खरेदी करायचा? माल विकला गेला नाही तर दोन वेळची चटणी भाकर कशी मिळायची हा प्रश्न लीलाबाईसमोर वर्ष २०१४च्या दुष्काळात उभा होता.
आज पाच-सहा वर्षानी लीलाबाईसमोर तोच प्रश्न आहे फक्त नियती कोरोनाची आहे. हीच स्थिती शहरांमध्ये राहणार्या एकट्या महिलांची आहे. रेशन कार्डवर धान्य देण्याची सरकारची योजना चांगली आहे पण, देशात अशा अनेक लाखो एकल महिला आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. ज्या महिलांना त्यांच्या नवर्याने कायदेशीररित्या विभक्त केलेले नाही ( परित्क्त्या / सोडून दिलेल्या महिला ) त्यांना कागदपत्राची पूर्तता करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रोजचं काम करायचं की त्याच्यामागे पळायचे म्हणून महिला हे सरकारी दस्तावेज करून घेण्यात कमी पडतात. लॉकडाऊनमुळे गावातील अर्थव्यवस्थाच बंद पडली आहे. त्यामुळे एकल महिलांसमोर जगण्याचे प्रश्न पुन्हा ‘आ’ वासून उभे आहेत.
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये आणि राज्याने रेशनच्या संदर्भात घोषित केलेल्या योजनेत एकल महिलांचा स्वतंत्रपणे उल्लेख होणे गरजेचे होते. कारण गावपातळीवर योजना महिलांपर्यत पोहचत नाही. महिला योजनेपर्यंत पोहचल्या तर योजना संपून गेलेली असते. याकरिता राज्यातील एकल महिलांसाठी धोरणात्मक बदल होणे गरजेचे आहे. आपत्तीच्या काळात नियोजन करतांना या नियोजनाच्या केंद्रस्थानी महिला-मुले असतील तरच ती योजना पूर्ण मानली पाहिजे.
The post लॉकडाऊन आणि एकल महिला appeared first on द वायर मराठी.


